सा.क्रांतिवीर....शेतकऱ्यांच्या कष्टाला मातीमोल करणाऱ्या शासनाच्या विरोधात रास्ता रोको.!
शेतमालाला भाव नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम आदमी पक्षाच्या वतीने नांदगाव-येवला मार्गावर केला रास्ता रोको.
नांदगाव - संतोष कांदे
दुष्काळ तालुक्यात ठाण मांडून बसलेला असतानाच,कसेबसे पिकवलेल्या खरीप व रब्बी हंगामातल्या तुटपुंज्या शेतमालाला ही भाव मिळत नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम आदमी पक्षाच्या वतीने बाजार समिती प्रवेशद्वाराजवळच्या येवला मार्गावर आज सकाळी रास्ता रोको आंदोलन छेडले.यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
यंदा तालुक्यात पाऊसच न पडल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.तसा शासकीय पातळीवर ही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे.व दुष्काळी परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजना राबवण्याचे आदेश ही तालुका प्रशासनाला प्राप्त आहेत.मात्र अशा परिस्थितीत जे काही अल्पसे शेती उत्पादन हाती आले,त्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.या उत्पादन विक्रीतून वाहतूक खर्च फिटेल इतकी ही रक्कम हाती येत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे.
या बाबीची दखल घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष निलेश चव्हाण,आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष विशाल वडघुले,स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष परशराम शिंदे,जेष्ठ नेते निवृत्ती खालकर, तालुका संघटक अप्पा बच्छाव, आम आदमी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष विकास गवळी,तालुका सचिव सुनील आहेर आदींनी शेकडो शेतकऱ्यांच्या सहभागाने हे रास्ता रोको आंदोलन छेडले होते.
यावेळी कांद्याला उत्पादन खर्च आधारीत हमीभाव,उन्हाळ कांदा खरेदी,पिक विम्याचे पैसे तत्काळ मिळावेत,चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे,चांदवड-जळगाव या राष्ट्रीय मार्गासाठी तालुक्यातील पाणी उपसा करू नये,गायीच्या दुधाला शासन निर्णय प्रमाणे प्रतिलिटर २५ रुपये दर मिळावा,आणि हे दर खाजगी दूध डेअरीना ही बंधनकारक करावेत.अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांनी आंदोलकांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले,यावेळी नायब तहसीलदार योगेश जमदाडे,बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार,बाबासाहेब साठे,आदी उपस्थित होते,तर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Comments
Post a Comment