सा. क्रांतिवीर..नांदगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर अनिश्चितता.!

दुष्काळ असल्याने गुप्तता पाळत सुरू आहेत राजकीय डावपेच..

                नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्याचे विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांनी भायखळा (मुंबई) येथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे लावलेले आदरांजलीचे पोस्टर...नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा नांदगावला वाढलेला वावर....भाजपच्या मनिषा पवार यांना तालुक्यावर दाटून आलेला उमाळा...शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी घरोघरी जाऊन दिवाळी गोड करण्याचा केलेला प्रयत्न....अशा अनेक घटनांनी तालुक्याचे आगामी राजकारण किंबहुना भावी विधानसभेची नांदी याचे स्पष्ट चित्र दृष्टीक्षेपात येत आहे.
       तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने खरीप हंगामासह रब्बी हंगामाची वाट लागल्यात जमा आहे.मात्र हार मानेल तो बळीराजा कसला.? म्हणून विहिरीत पाण्याचा खडखडाट असताना कांदा लागवड करून जुगाराला सुरुवात बळीराजाने केव्हाच केली आहे.यात जमेची बाजू इतकीच की,शासनाने ही फारसा अंत न पाहता तालुका गंभीर दुष्काळी जाहीर केला आहे.दुष्काळी उपाययोजनांचे नियोजन शासकीय पातळीवरून केले जात आहे.उपलब्ध जलसाठ्यांमधील पाणी यापूर्वीच आरक्षित केले गेले आहे,किंबहुना गेल्या वर्षाचे आरक्षण उठवण्याची गरज न पडता तेच आरक्षण पुढे लागू करण्यात आले.
     तालुक्यात अशी बिकट परिस्थिती असल्याने राजकीय पातळीवर साहजिकच या गोष्टीची काळजी घेऊन पाऊले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेस,राष्ट्रवादी आघाडी झाल्यात जमा असल्याचे एकंदर चित्र असल्याने तालुक्यात काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका पार पाडेल, यात काही शंका नाही.तर राष्ट्रवादीतले प्रमुख मोहरे गळाले असले तरी आनंदी-आनंद आहे.कारण ज्यांना यापूर्वीच्या सुगीच्या दिवसात अडचणीची जागा होती,ते अग्रक्रमावर आल्याने त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी गावागावात जावून पक्षाचे ध्येयधोरणे पटवून देत आगामी विधानसभेचा कानोसा घेतला,असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.त्याचबरोबर शिवसेनेचे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून भायखळा (मुंबई) येथे आदरांजलीचा फलक लावला.मात्र त्याचे पडसाद येथील राजकीय वर्तुळात उमटले.कारण त्या मतदार संघातून यापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ आमदार झालेले आहेत.तर या नांदगाव तालुक्यात नंबर एकचा पक्ष म्हणून शिवसेना आहे.आणि सध्या माजी खासदार समीर भुजबळ यांचा अलीकडच्या काळात तालुक्यात संपर्क वाढल्याचे दिसते.मग या दोन्ही घटनांचा अन्वयार्थ काय कसा लावायचा.? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
        केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या मनिषा पवार यांचे तालुक्यावर अचानक वाढलेले प्रेम स्थानिक नेत्यांमध्ये चल-बिचल करून जात आहे.तसेच पवार व विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांच्यात एका पाणी योजनेसाठी आणलेल्या निधीवरून श्रेयवाद लढाई यापूर्वीच होऊन गेली आहे.पण चेहऱ्यावर उसने हसू आणून वेळ मारून नेली जात आहे.त्याचबरोबर एक सनदी सेवेत असलेले अधिकारी ही काही दिवसांपूर्वी तालुक्याचा धावता दौरा करून गेले आहेत.राज्यातील सत्तेवर असलेल्या एका मंत्री महोदय यांच्याबरोबर असलेली त्या अधिकाऱ्याची उठबैस कदाचित काही रंग आणते का.? हा एक औत्सुक्याचा विषय आहे.
       पोस्टर प्रकरणात माजी मंत्री भुजबळ यांनी पटणारा खुलासा केला असला तरी प्राप्त राजकीय परिस्थिती शंका घ्यायला लावते आहे.एक आमदारकी सोडली तर दोन्ही नगरपालिका,दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्या,दोन जिल्हा परिषद गट,पंचायत समिती,जिल्हा मजूर संघ,औद्योगिक संघ,जिल्हा बँक,अशा झाडून सर्व सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहेत.आणि सुहास कांदे आगामी विधानसभेचे प्रमुख दावेदार आहेत.आणि त्यामुळेच भुजबळांची शिवसेनेशी सलगी वाढली की,त्याचा येथील शिवसेनेत अदृश्य असा गोंधळ निर्माण होतो.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ