सा. क्रांतिवीर..माणिकपुंज धरणासह,कासारी परिसरातील ३७५ विजपंप हटवले.!
नांदगाव-: संतोष कांदे
काल (दि.४) रोजी ठरल्याप्रमाणे तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांनी आज सकाळी सात वाजताच माणिकपुंज धरणावर भेट देत धडक कारवाई केली.यावेळी सुमारे ३७५ विजपंप हटवण्यात आले.
तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे,शेतीसाठी सोडाच,पण पिण्याचे पाणी मिळणे ही येत्या काही दिवसात दुरापास्त होणार असल्याने तालुक्यातील उपलब्ध जलसाठ्याचे रक्षण करण्यासाठी सर्व प्रमुख प्रशासन सजग झाले आहे.त्या अंतर्गत आज माणिकपुंज धरण,गळमोडी,चांदेश्वरी अशा ठिकाणचे ३७५ विजपंप काढण्यात आले. काल (दि.४) रोजी उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे,तहसीलदार श्रीमती भारती सागरे,गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी,नायब तहसीलदार योगेश जमदाडे,तसेच जलसंपदा,वीज वितरण,पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी माणिकपुंज धरणासह पाणी उपलब्ध असलेल्या जलसाठ्यांना भेटी देवून पाणी रक्षणाच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या.
यंदा तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.२५ ते ३० टक्के पिक उत्पादन हाती येईल असा अंदाज आहे.मात्र आता प्रशासनाचे सर्व लक्ष पिण्याच्या पाण्याकडे केंद्रित झाले आहे.अनेक गावांत पावसाळा सुरू होऊन संपत आला तरी टँकर मात्र सुरूच राहिल्याने येत्या काही दिवसात पाणी प्रश्न जटील बनणार आहे.
तालुक्यातील पूर्व भागात असलेले माणिकपुंज,गळमोडी, चांदेश्वरी आदी जलस्रोतांमध्ये बऱ्यापैकी पाणी असल्याने हे पाणी शेतकरी शेतीसाठी वापरत होते,तालुक्याचा विचार करता हे पाणी टँकर द्वारे का होईना,तुषार्त गावांना देणे शक्य असल्याची बाब लक्षात घेवून आज सकाळी तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांनी सकाळी सात वाजताच विजपंप सुरू असलेल्या ठिकाणी भेट देत विजपंप तत्काळ काढून टाकण्यास भाग पाडले.त्यात माणिकपुंज धरण परिसरातील दोन्ही बाजूचे ३०० विजपंप काढण्यात आले.तर यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी 'आम्ही विजपंप बंद ठेवतो,मात्र कालवा किंवा नदीला पाणी सोडू नये.अशी मागणी केली.तर कासारी येथील गळमोडी व चांदेश्वरी येथील ७५ विजपंप काढून टाकण्यात आले.यावेळी कासारी च्या सरपंच सुनिता इप्पर यांचे पती कांतीलाल इप्पर यांनी 'सदर जलस्रोत पूर्ण भरलेले असल्याने त्यावर अजून आरक्षण नसल्याने रब्बी हंगामासाठी सदर पाणी उपसा करू देण्याची मागणी केली.मात्र पिण्याचे पाणी अधिक महत्त्वाचे असल्याने अशी परवानगी देता येत नसल्याचे तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांनी स्पष्ट केल्याने वाद संपुष्टात आला.
Comments
Post a Comment