सा. क्रांतिवीर...सार्वजनिक जलसाठ्यातून शेतीसाठीचा पाणी पुरवठा तत्काळ बंद करण्यासाठी प्रशासन सरसावले
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने उद्या पासून सुरू होणार कारवाई
नांदगाव---संतोष कांदे
तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे,शेतीसाठी सोडाच,पण पिण्याचे पाणी मिळणे ही येत्या काही दिवसात दुरापास्त होणार असल्याने तालुक्यातील उपलब्ध जलसाठ्याचे रक्षण करण्यासाठी सर्व प्रमुख प्रशासन सजग झाले आहे.त्या अंतर्गत आज उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे,तहसीलदार श्रीमती भारती सागरे,गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी,नायब तहसीलदार योगेश जमदाडे,तसेच जलसंपदा,वीज वितरण,पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी माणिकपुंज धरणासह पाणी उपलब्ध असलेल्या जलसाठ्यांना भेटी देवून पाणी रक्षणाच्या सूचना संबंधितांना केल्या.
या बाबत अधिक असे की,तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे.२५ ते ३० टक्के पिक उत्पादन हाती येईल असा अंदाज आहे.मात्र आता प्रशासनाचे सर्व लक्ष पिण्याच्या पाण्याकडे केंद्रित झाले आहे.अनेक गावांत पावसाळा सुरू होऊन संपत आला तरी टँकर मात्र सुरूच राहिल्याने येत्या काही दिवसात पाणी प्रश्न जटील बनणार आहे.
तालुक्यातील पूर्व भागात असलेले माणिकपुंज,गळमोडी, चांदेश्वरी आदी जलस्रोतांमध्ये बऱ्यापैकी पाणी असल्याने हे पाणी शेतकरी शेतीसाठी वापरत होते,तालुक्याचा विचार करता हे पाणी टँकर द्वारे का होईना,तुषार्त गावांना देणे शक्य असल्याची बाब लक्षात घेवून प्रांताधिकारी दराडे,तहसीलदार श्रीमती सागरे,जमदाडे,गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख अधिकारी वर्गाने आज या जलसाठ्यांना भेटी देत शेतकऱ्यांना विजपंप काढून घेण्याच्या सूचना दिल्या,आणि यासाठी उद्या (दि.५) सकाळी ८ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.त्यानंतर विजपंप जप्त करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
प्रतिक्रिया-: तहसीलदार श्रीमती भारती सागरे-: आज सकाळपासून प्रांताधिकारी भीमराज दराडे व सर्व सहकारी अधिकारी यांच्या समवेत सद्यस्थितीत पाणी उपलब्ध असलेल्या जलसाठ्यांची पाहणी केली.व पिण्याच्या पाण्याचे महत्व शेतीपेक्षा अधिक असल्याची बाब संबंधितांना पटवून देण्यात आली.त्यामुळे उद्या सकाळी आठ नंतर कडक कारवाई केली जाईल.कुणाचीही गय केली जाणार नाही.
Comments
Post a Comment