सा.क्रांतिवीर...आ.भुजबळ यांच्या प्रयत्नाने तालुक्यात ६ कोटी २७ लाख रुपयांची कामे मंजूर.!
नांदगाव-: संतोष कांदे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संशोधन व विकास निधीतून नांदगांव मतदार संघात आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नाने सुमारे ६ कोटी २७ लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्यांची कामे मंजूर झाली असून, लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन नांदगांव मतदार संघातील रामा-२५ (नांदगांव) ते जगधनेवाडा रस्ता ग्रामा-६८ किमी २.४०० (LR-24) या रस्त्यासाठी १ कोटी ६४ लक्ष रुपये, पांझणदेव (धोटाणे बु.) ते काळेवस्ती रस्ता ग्रामा-११६ किमी २.०४० (LR-37) या रस्त्यासाठी १ कोटी ३० लक्ष रुपये, प्रजिमा-९१ (लोढरे) ते ठाकरवाडी ग्रामा-१९ किमी १.९९० (LR-13) या रस्त्यासाठी १ कोटी २४ लक्ष रुपये तर प्रजिमा-९२ (जातेगांव) ते गोंडेगांव बोलठाण रस्ता इजिमा-१५४ किमी ३.४९० (TR-09) या रस्त्यासाठी २ कोटी ८ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांची पुढील ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे.
मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले रस्ते तसेच या रस्त्यांवरील काळेवस्ती, ठाकरवाडी व इतर वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्यास अडचणी येत होत्या. व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे या वस्तींवरील रहिवाशांनी सदर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी केली होती. त्यामुळे आमदार पंकज भुजबळ यांनी रस्त्यांच्या कामांसाठी वेळोवेळी प्रश्न मांडून व लेखी पत्राद्वारे पाठपुरवा केल्यामुळे रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे या रस्त्यांवरील गावे व वस्त्यांवरील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment