सा.क्रांतिवीर...नांदगाव तालुक्यात दुष्काळी उपाययोजना कराव्यात-आ.पंकज भुजबळ

पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे तालुका दौऱ्यादरम्यान केली मागणी.!

नांदगाव-: संतोष कांदे
       नांदगांव मतदार संघात या वर्षी अत्यल्प पाऊस पडला आहे. पावसाअभावी पेरण्या वाया गेलेल्या आहेत, तर काही ठिकाणी पाण्याअभावी पिके करपून गेलेली आहेत. मतदार संघातील जनता दुष्काळाने हवालदिल झालेली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगाराचा प्रश्न व अन्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे नांदगांव मतदार संघात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
      मतदार संघातील गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गिरणा धरणात ३०० द.ल.घ.फू. पाणी आरक्षित करण्यात यावे. टँकर भरण्यासाठी गिरणा धरण परिसरात यंत्रणा उभारण्यात यावी.
       नांदगांव मतदार संघातील प्रत्येक गावाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्या गावातील वाड्या, वस्त्या, पाडे, तांडे यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच मनमाड शहराला १२ ते १५ दिवसांनंतर व नांदगांव शहराला १० दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे दोनही शहरांना देखिल टँकरद्वारे पिण्याचे पाणी देण्यात यावे.
        जनावरांना चारा व पाणी मिळणेसाठी गिरणा, माणिकपुंज, कासारी धरण परिसरात छावण्या उभारण्यात याव्यात अशी शेतकरी व पशुपालकांची मागणी आहे. त्यादृष्टीने पाहणी करून नियोजन करण्यात यावे.दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगार उपलब्ध नाही त्यामुळे प्रत्येक गावाचा रोजगार हमी योजनेचा आराखडा तयार करून त्या आराखड्यात जलसंधारणाच्या कामांचा जास्तीत जास्त समावेश करण्यात यावा.
       नांदगांव तालुक्यातील घाटमाथ्यावरील ढेकु, कुसुमतेल, जातेगांव, लोढरे, बोलठाण, गोंडेगाव, रोहिले बु, जवळकी या गावांना कासारी घाटामुळे टँकरद्वारे पाणी देण्यास अडचणी निर्माण होतात त्यामुळे सदर गावांना वैजापूर तालुक्यातील मन्याड पारळा साठवण तलावातून टँकरद्वारे पिण्याचे पाणी मिळावे.
         दुष्काळाची स्थिती असतांनाही वीज वितरण कंपनी मार्फत जळालेले रोहित्र विज देयके भरल्याशिवाय बदलून दिले जात नाही. शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे जळालेले रोहित्र तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. रात्रीचे भारनियमन केले जात आहे ते बंद करण्यात यावे.
         शेतकर्यांच्या कृषी वीज पंपांची वीज बिले माफ करण्यात यावीत.विद्यार्थ्यांची शैक्षणिक व परीक्षा फी माफ करण्यात यावी.गिरणा धरणावरून नांदगांव व ५६ खेडे पाणी पुरवठा योजनेसाठी टंचाई अंतर्गत १ व्हीटी पंप १८० एच पी चा, गिरणा धरणासाठी पांझण येथे ७० एच पी चा विद्युत पंप, साकुरी ता. मालेगांव ७० एच पी चा, घोडेगांव पंपिंग स्टेशन येथे ७० एच पी व सर्व ठिकाणी व्हॅक्यूम पंप याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे पाठविण्यात यावा व टंचाई अंतर्गत हे पंप खरेदी करण्यात यावे.  

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ