सा.क्रांतिवीर...तालुक्यात मका विक्रीतून एका दिवसात ९७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या पदरात.!
ऐन दुष्काळात शेतकऱ्यांच्या फाटक्या संसाराला मका पिकाचे थिगळ..
नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्यातल्या १० गावांत झालेल्या पिक कापणी प्रयोगात मका पिक ५० टक्क्यांपेक्षा ही कमी उत्पादित झाले आहे.त्यामुळे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व दोन उपबाजार मिळून काल (दि.२२) रोजी ४३२ वाहनांतून ७ हजार २२३ क्विंटल मका आवक झाली.तर या मका विक्रीतून ९७ लाख ३२ हजार १५० रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार,नांदगाव मुख्य बाजार समितीत दिवसभरात २८५ वाहनांतून ४ हजार ७२४ क्विंटल आवक आली.त्यास कमाल-१४२१,किमान-१२०० तर सरासरी-१३४० रुपये असा प्रति क्विंटल भाव मिळून ६५ लाख २० हजार २५० रुपये प्राप्त झाले,तर बोलठाण उपबाजार समितीत १०२ वाहनांतुन १९४५ क्विंटल आवक झाली.त्यातून २५ लाख २८ हजार ५०० रुपये प्राप्त झाले.
न्यायडोंगरी उपबाजार समितीत ४५ वाहनांतून अवघी ५३६ क्विंटल आवक होऊन ६ लाख ८३ हजार ४०० रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले.या मका विक्रीतुन एका दिवसात बाजार समितीला ९७ हजार ३२१ रुपये बाजार फी पोटी प्राप्त झाले आहे.
दुष्काळाचे कवित्व शासन पातळीवर जोरात सुरू आहे.दुष्काळ जेव्हा जाहीर व्हायचा तो होईलच,पण उपलब्ध पाण्याच्या जोरावर बहुतांश शेतकऱ्यांनी मका पिक जगवले,त्याची फलश्रुती या अल्पशा का होईना उत्पन्नाने झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत आजचे उत्पादन कमी असले तरी भाव जास्त असल्याने गतवर्षी मिळालेल्या रकमेचा मेळ मात्र बसत आहे.
प्रतिक्रिया-तेज कवडे ,सभापती नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
इतर बाजार समित्यांच्या तुलनेत चांगले भाव,२४ तासाच्या आत रोख पेमेंट.! आदी सुविधेमुळे दुष्काळात शेतकऱ्यांना मका पिकातून का होईना बऱ्यापैकी अर्थार्जन होत आहे.आणि गतवर्षीप्रमाणे यंदा ही मका विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून बाजार समिती संचालक मंडळ व प्रशासन सजग आहेत.
Comments
Post a Comment