सा.क्रांतिवीर..छोट्याशा सोयगाव करांची श्री.गणेशांनी बांधली एकतेची गाठ

लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा करत ग्रामस्थांचे मनोमिलन.

नांदगाव-: संतोष कांदे

एक गांव.. बारा भानगडी..काही वर्षांपूर्वी ग्रामीण राजकारणाची बाज असलेला हा मराठी सिनेमा..आपल्या गावातील हुबेहूब चित्रण म्हणून हा सिनेमा खूप गाजला होता..आणि त्याला गावे ही अपवाद नव्हती.अगदी याच पठडीत घट्ट बसेल असे नांदगाव तालुक्यातील सोयगाव...ग्रामीण राजकारणाच्या सर्वच क्लृप्त्या वापरून येथे सत्तेचा सारीपाट खेळला जातो.त्यामुळे दुभंगलेली मने मरेपर्यंत जुळली जात नाहीत.आणि मरणानंतर ही पुढच्या पिढीला ह्या दुष्मनीचा वारसा देवून गावातील सामाजिक शांततेचा बळी देण्याचे काम अशा पद्धतीने अव्याहतपणे सुरू असते.यंदा मात्र ह्या गोष्टीला सुखद म्हणता येईल असा तडा गेला.. 'एक गांव एक गणपती'ने सर्व जातीधर्माच्या लहान-थोरांनी एकत्र येत हा आदर्श घडवला.
      नांदगाव आणि येवला (दहेगाव मार्गाने)  या रस्त्यावर हे छोटेसे गांव..तालुक्याच्या गावापासून साधारणतः १२ किलोमीटर अंतरावर वसलेल हे छोटस खेड.! अंदाजे १६०० लोकसंख्या..या गावात दरवर्षी गणपती उत्सव साजरा होत असे,मात्र ज्या-त्या गटाचा सवतासुभा ठरलेला. गावात दोन तीन गणेश मंडळे, म्हणजेच लोकमान्य टिळकांनी मांडलेल्या संकल्पनेला सरळ-सरळ दिलेला छेद.यावर्षी मात्र गावाने शासनाला व लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत अशी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला.आणि तसा वज्रनिर्धार करून संकल्पना कृतीत ही उतरवली.सर्व जाती,धर्म,पंथ आणि विशेष म्हणजे तरुणांसह,जेष्ठांनाही या संकल्पनेत भक्कम स्थान असल्याने या आदर्श कल्पनेला सर्वांचीच भक्कम साथ मिळाली.आणि बघता बघता सर्व गांव एकजुटीने रोजच्या आरतीला सर्व कामे बाजूला ठेवून एकत्र येऊ लागले.
          रोजच्या आरतीसाठी प्रत्येक घरातून आणलेला प्रसाद एकत्र करून सर्वांना दिला जाऊ लागला.त्यामुळे जशा जातीयतेच्या भिंती गळून पडल्या,तसा पिढ्यानपिढ्या राजकारणातून आलेला दुष्मनीचा वारसा धूसर झाला.या अकरा दिवसांत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.आणि त्याचा ग्रामस्थांनी मनसोक्त आनंद ही घेतला.यामध्ये संगीत खुर्ची,लिंबू चमचा,  कबड्डी,धावण्याच्या स्पर्धा,रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.आणि त्यात गावातील आबालवृद्धांनी सहभाग नोंदवत या क्षणांचा आनंद द्विगुणित केला.
       शेवटच्या निरोप प्रसंगी झालेल्या महाप्रसादाने या आदर्शवत सोहळ्यावर कळस चढला.असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ