सा.क्रांतिवीर...शेतमालाच्या मातीमोल भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.!
टॉमेटो, मिरची,कोबी,फ्लॉवर, आणि मोठ्या कष्टाने पिकवलेला व सोन्यासारखा जपलेल्या कांद्याने ही लावली वाट..
नांदगाव-: संतोष कांदे
यंदा पर्जन्यमान अत्यंत जमतेम राहीले, मृग नक्षत्रात थोडाफार शिडकावा झाला,पुढे पाऊस पडेल या भरवश्यावर पेरण्या पूर्ण करण्यात आल्या.मात्र नंतर प्रतिक्षेव्यतिरिक्त फारसे काही पदरात पडले नाही.आहे त्या उपलब्ध पाण्यावर भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेला बिकट परिस्थिती आली आहे.
टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली.पण गेल्या सहा महिन्यांपासून कुठल्याच भाजीपाल्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे ही अशक्य झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील देवळा तालुक्यासह अनेक तालुक्यात भाजीपाला पिकांची अवस्था सांगता ही येत नाही,अन सहन ही होत नाही अशी झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात सर्वात मोठी घसरण झाली असून, टोमॅटो उत्पादक शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. उत्पादनखर्चही निघत नसल्यामुळे देवळा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी आता शेतात मेंढ्या सोडल्या आहेत.टोमॅटो बाजार समिती पर्यत नेण्यासाठीचा खर्चही आता खिशातून भरण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बुधवारी देवळा भाजीपाला बाजार समितीत टोमॅटो २० किलो ला २० ते ४५ रुपये प्रति कॅरेट ने विकले गेल्याने शेतकऱ्यांवर आता आधीच्या भांडवलासोबत तोडण्याची मजुरी व गाडीभाडे स्वतःच्या पैशातून पूर्ण करावे लागत आहे.टोमॅटो पिकासाठी महामुर खर्च करून हातात शासनाच्या अनिश्चित कृषीविषयक धोरणांमुळे एकही रुपया येत नाही आहेत.
प्रतिक्रिया :-
" गेल्या काही महिन्यांपासून शेतीमाल निर्यात करण्यासाठी परदेश सीमा बंद असल्याने आमचा शेतीमाल येथे कवडीमोल भावाने विकला जात आहे, यात शासनाने लक्ष घालणे महत्वाचे आहे".
- अविनाश बागुल, प्रगतशील शेतकरी, माळवाडी
याच माळवाडी परिसरात शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून पारंपरिक शेतीला बगल देत ठिबक सिंचनाचा उपयोग करून कोबी, फ्लॉवर पिकांची निवड करून नवनवीन प्रयोग करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले. यात कमी दिवसांचे पीक म्हणून १५० हजार रुपयांचे 'बी' घेऊन कोबी फ्लॉवर ची लागवड करून, १२० ते १३० दिवसांत निरोगी उत्पादन काढले; परंतु देवळा भाजीपाला बाजार समितीत चक्क कोबी फ्लॉवर चा व्यापाऱ्यांनी लिलावच केला नाही, म्हणून फुलेमाळवाडी ता. देवळा येथील अक्षय शेवाळे या युवा शेतकऱ्यावर फ्लॉवर फेकून देण्याची नामुष्की आली.
शेतकरी अक्षय शेवाळे यांनी एक एकर कोबी फ्लॉवर लागवड केली. एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च करून कोबी, फ्लॉवर ला एक दोन रुपये किलो भाव तर सोडाच, पण येथे आता तर लिलावच केला गेला नाही, यामुळे कोबी फ्लॉवर विकून खर्चही निघत नाही म्हणून विक्रीस नेलेली २० किलो च्या ४२ पिशव्या फ्लॉवर बाजार समितीच्या आवारात गाईंना तर नदीत मेंढीना चारा म्हणून फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
प्रतिक्रिया :-
" भाव तर नाहीच नाही पण आता देवळा बाजार समितीत कोबी फ्लॉवर चा तर चक्क लिलावच करत नाहीत, आता या नामिश्कीला जबाबदार कोण" ?
- अक्षय शेवाळे, युवा शेतकरी, फुलेमाळवाडी.
" स्थानिक बाजारपेठेत आवक वाढली अन परराज्यात भाजीपाला पाठविण्यासाठी डिझेलसह इतर खर्च परवडत नसल्याने स्थानिक ठिकाणी अल्प किमतीत भाजीपाला खरेदी करावा लागत आहे"
निकेश जाधव, भाजीपाला व्यापारी
मिरची ५ रु किलो
कांदा मका या नगदी पिकांना भाव
नसल्याने भाजीपाला पिकातून दोन पैसे कमावण्याच्या आशेवर शेतकऱ्यांनी आपला कल भाजीपाला लागवडीकडे वळवला आहे. परंतु यंदा कुठल्याही राजकीय पक्षाला शेतकऱ्याकडे पाहण्यासाठी वेळ नाहीच नाही आणि शासनही शेतकाऱ्यांबाबत उदासीन असल्याने शेतीमाल कवडीमोल भाव मिळत असल्याने पीक तरी कोणते घ्यावीत?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
माळवाडी येथील संतोष बागुल यांनी ठिबक, मल्चिंग पेपर या आधुनिक पद्धतीचा अवलंब करून सितारा प्रजातीची मिरची लागवड केली. शेत तयार करण्यासाठी ट्रॅक्टर खर्च, ठिबक, मिरची रोप, दिवसाआड दिली जाणारी लिक्विड खते फवारणी, तार काठी, दोरी, मजूर, आणि इतर खर्चाचा बोजा पाहता अल्प बाजारभावाने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.संतोष बागुल यांनी बुधवारी देवळा बाजार समितीत मिरची विकण्यासाठी पाठवली, तेथे अवघा किलोला उंच भाव ५ रुपये मिळाला.
मिरचीला निरोगी ठेवण्यासाठी वेळो-वेळी उत्पादन खर्च करून अल्प बाजारभावाने पुढे खर्च करावा की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे; परंतु आज ना उद्या भाव मिळेल या भाबड्या आशेवर राहून उधारीने का होईना खर्च करीत आहेत शेतकरी. आता पीक तरी कुठले करावे सुचत नाही कारण हीच परिस्थिती कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, गिलके, शेवगा, मेथी, कांदा पिकांची झाली आहे. प्रतिक्रिया :-
" सामान्य ग्राहक चैनी वस्तू, फॅशनेबल राहणं, हॉटेल, फिरणे, बंद पॉकेट वस्तू यासाठी अवाजवी खर्च करतो मग शेतकार्याच्याच मालाला का कमी अधिक भाव करतो, हे पहिल्यांदा बदलणे गरजेचे आहे "
- संतोष बागुल, शेतकरी, माळवाडी.
" आम्हाला बाजार समिती पेक्षा वाढवा भावाने व्यापाऱ्यांकडून भाजीपाला मिळतो आणि तो दिवसभर हात विक्री करून शेतकाऱ्यांपेक्षा दुप्पट भावाने विकला जातो "
- भोला शेठ, किरकोळ भाजीपाला विक्रेते.
कांदाही करतोय वांदा....
या वर्षात भाजीपालासह शेती उत्पादित मालाला कुठलाच भाव मिळत नाही आहे. त्याचप्रमाणे कसमादे भागात आर्थिक उलाढाल ठरणारे नगदी पीक कांद्यालाही भाव न मिळण्याचे ग्रहण लागले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे भाव वाढतील या भरवश्यावर शेतकरी अवलंबून होता, त्याला आता कोसळत चालल्या कांदा भावाला सामोरे जावे लागणार आहे.
कसमादे भागात कांदा या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उन्हाळ आणि पावसाळी हंगाम घेतला जातो. या भागातील सर्व व्यवहार हे कांदा पिकावर अवलंबून असते; परंतु मात्र आता यंदा कांदा पिकाने सततच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा वांदा केल्याचे चित्र दिसून येत आहे.
लागवडी पासून ते चाळीत साठवणीसह विक्री करेपर्यंत एकरी कांदा पिकाला ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो आणि त्यातून आज कांद्याला प्रति क्विंटल ६०० ते ७०० रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रतिक्रिया :-
कांदा चाळीत साठवून पुढे चांगले पैसे मिळतील या भरवश्यावर साठवणूक केली, आणि आज रोजी वजन घट, सड सहन करून ६०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने दुकानदारांच्या उधाऱ्या आणि कर्जाचा डोंगर जसल्या तसा राहण्याची वेळ या कुचकामी शासनाच्या धोरणामुळे अली आहे.
- घनश्याम बागुल, युवा शेतकरी, माळवाडी.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी गारपीट, अवकाळी पाऊस यांचा सामना करत आहे. बाजार समितीत हमीभाव भेटत नाही. उत्पादन खर्च कवडीमोल भावामुळे निघत नाही. उधारी कर्ज फेडण्याची चिंता पडली आहे. बाजारातून घरी मात्र दमडीही शिल्लक येत नाही. यालाच का "अच्छे दिन" म्हणायचे का.? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.
Comments
Post a Comment