सा.क्रांतिवीर...मनमाड येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्याची शिवसेनेची मागणी.!
मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
नांदगाव----संतोष कांदे
देशातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन,सर्वात मोठे अन्न-धान्य गोदाम,पेट्रोलियम कंपन्या अशी देशपातळीवर ओळख असलेल्या मनमाड शहरात ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्याची मागणी गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित असल्याने अपघातग्रस्त रुग्णांची ससेहोलपट होत आहे.आणि ही बाब हेरून शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी या मागणीचा पुनरुच्चार करत लवकरात-लवकर ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना.दिपक सावंत यांच्याकडे केली आहे.
आरोग्यमंत्री ना.सावंत यांना दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, शहरात व लगतच्या परिसरात देशपातळीवरील प्रकल्प सध्या कार्यरत आहेत,आणि राज्य मार्गासह राष्ट्रीय महामार्ग ही प्रस्तावित आहे,त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांची मालिकाच कधी-कधी निर्माण होत असते,मात्र येथील उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर ची सुविधा उपलब्ध नाही,तसेच अस्थितज्ञ ही नाही.परिणामी रुग्णांना मालेगाव,किंवा नाशिक चा मार्ग धरावा लागतो.
चांदवड,येवला येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर झाले,मात्र देशात महत्व राखून असलेल्या मनमाड ला का होत नाही.? हा कळीचा मुद्दा आहे.गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने ही मागणी करत असताना याची दखल घेतली जात नाही.तरी यावर जलद गतीने कार्यवाही व्हावी.अशी मागणी शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रति आरोग्य विभागाच्या जिल्हा,राज्य पातळीवरील वरिष्ठ कार्यालयांना पाठवण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment