सा.क्रांतिवीर...तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा एकट्या तालुकाध्यक्षावर..
नांदगाव---संतोष कांदे
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून गावातील जेष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून पुढील काळात पक्ष बांधणी करण्याचा निर्धार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.मात्र ही धुरा एकट्या तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या खांद्यावर सोपवून पक्ष निर्धास्त असल्याचे चित्र गावागावात होत असलेल्या बैठकांमधून दिसून येत आहे.
गिरणानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नुकतीच पार पडली.यापूर्वी झालेल्या अनेक बैठकांमधून ही त्या-त्या गावांमधील जेष्ठ पक्ष कार्यकर्ते व तरुण कार्यकर्त्यांचाच भरणा अधिक दिसून येतो.मग गेल्या नऊ वर्षांपासून भुजबळ कुटुंबीय किंवा त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाखाली तुंबड्या भरलेले नेते कुठे.? असा प्रश्न साहजिकच आता उपस्थित होऊ लागला आहे.
पंकज भुजबळ या तालुक्याचे आमदार झाल्यापासून तालुक्यातील सर्वच बिनीचे नेते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झाले होते.स्वपक्षात नेते असलेले अनेक रथी-महारथी स्वार्थासाठी राष्ट्रवादीत जाऊन 'कार्यकर्ते' बनले होते.दुसऱ्यांदा आमदार होऊन पंकज भुजबळ यांनी तालुक्याचा इतिहास मोडला व सलग आमदार होण्याचा इतिहास ही घडवला,मात्र राज्यातील सत्ता गेल्याने ते फक्त नावालाच आमदार उरले असल्याचे चित्र त्यांच्याच निष्क्रियतेने तालुक्यासमोर ठेवले गेल्याने साहजिकच हे राष्ट्रवादीतील संधीसाधू कार्यकर्ते अलगद दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा 'नेते'बनले आहेत.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांचे कार्य मात्र वाखाणण्याजोगे असते.ते यापूर्वी शिवसेनेत होते,तेव्हाही त्यांनी जीव ओतून काम केले होते.माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यासह अवघा जिल्हा आपल्या कह्यात आणला होता,झाडून सर्व प्रस्थापित नेते कार्यकर्ते बनवले होते,फक्त शिवसेनेचे संतोष गुप्ता सोडून......
गुप्ता यांनी काही कारणास्तव सेना सोडली,तेव्हा भुजबळ यांनी क्षणाचाही विचार न करता तालुक्यातील राष्ट्रवादीची धुरा संतोष गुप्ता यांच्यावर सोपवली आहे.गुप्ता यांनी भुजबळ यांचा विश्वास सार्थ ठरवत,फक्त व्ही.टी. संकुल पुरतीच मर्यादित असलेली राष्ट्रवादी गावागावात नेण्यास सुरुवात केली आहे.
Comments
Post a Comment