सा.क्रांतिवीर...सर्वच पक्ष विधानसभेसाठी सज्ज पण 'की जय'म्हणणारे कार्यकर्ते कुठे.?
सर्वच राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांची हेळसांड होत असल्याने ओढवली ही परिस्थिती....अशी खुद्द निष्ठावंत कार्यकर्त्यांची खंत..
नांदगाव ----संतोष कांदे
विद्यमान सत्ताधारी (फक्त आमदारकी) राष्ट्रवादी....अन उर्वरीत सर्वच सत्ता ताब्यात असलेली शिवसेना....यासह छोटे-मोठे कार्यक्रम घेत कासव गतीने वाटचाल करत असलेली भाजप....आणि जिल्हा परिषद सदस्या कु.अश्विनी आहेर यांच्या नेतृत्वाला चालना देत असलेली काँग्रेस यासह सर्वच राजकीय पक्षाकडून आगामी विधानसभेची रंगीत तालीम सुरू असल्याचे चित्र दिसते.मात्र पक्षाची ध्येय धोरणे,कार्यक्रम,विकासात्मक गोष्टी जनतेपर्यंत पोहचवणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांची सर्वत्र वानवा असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात सलग आमदार होत नसल्याचा इतिहास आमदार पंकज भुजबळ यांनी मोडला.याचे कारण पहिल्या टर्ममध्ये जी भव्य-दिव्य विकासकामे केली,त्याचे ते फलित होते.मात्र दुसरी टर्म सुरू झाल्यानंतर विकासकामे सोडाच,त्यांचे साधे दर्शन ही दुर्लभ झाले.याउलट कारावासातून बाहेर आल्यानंतर माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी मात्र अवघा जिल्हा पायाखाली घातला.
आमदार पंकज भुजबळ यांनी दुष्काळच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतल्याचा अपवाद वगळता तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याची भावना जनतेत उमटून आली.तर राज्यातल्या सत्ताधारी भाजप-शिवसेना यांनी ही तहसीलदारांना निवेदन देण्यापलीकडे फारसे काही केल्याचे चित्र दिसले नाही.
शिवसेनेत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयात कार्यकर्त्यांना पदे खिरापत वाटावी,तशी वाटली जात असल्याचे शल्य अनेक जेष्ठ शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.आणि हे आयात कार्यकर्ते,पदाधिकारी विधानसभा निवडणुकीपर्यंत जिल्हाप्रमुख कांदे यांची साथ करतील का.? याबाबत या निष्ठावान कार्यकर्त्यांना खात्री नाही.जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना ही धोक्याची घंटा वेळीच ओळखता आली तर उपाययोजना शक्य आहे,अन्यथा आयात केलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात खरा शिवसैनिक बाजूला जाण्याची भीती अधिक आहे.
तर भाजप मध्येही सर्व आलबेल आहे,असेही नाही.गटातटाच्या राजकारणाने सर्वच पक्षांना घेरले असल्याचे चित्र दिसते आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा एकट्या तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांच्यावर टाकून पक्ष निर्धास्त असल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी गावागावातल्या बैठकांमधून दिसून आले,तर या बैठकांवर मात करण्यासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांचे हुकमी कार्ड वापरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमधील हवाच काढून टाकली.तर जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांच्या मागणीची दखल घेत नांदगाव तालुक्याला पूर्णवेळ तहसीलदार मिळाल्याने त्यांच्या पंखांना आपसूकच बळ मिळाले आहे.
बाकी दोन दिवस पडलेल्या भिज पावसाने पिकांची परिस्थिती पहिल्या पेक्षा बरी झाली,इतकेच.! पण उत्पादनात जी घट येणार आहे,ती निश्चित.धरण साठ्यात थोडी-बहुत वाढ झाली असली तरी पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न भविष्यात पाऊस पडला नाही तर पडणार आहेच.त्याच बरोबर जनावरांना चाऱ्याचा प्रश्न ही गंभीर स्वरूप धारण करणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही.
Comments
Post a Comment