सा. क्रांतिवीर....पाऊस गायब....आणि लोकप्रतिनिधी ही..?
नांदगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल..भजन,कीर्तनातून पावसाची आळवणी
नांदगाव----संतोष कांदे
आधीच अल्प पावसावर खरीप पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने ओढ देवून मेटाकुटीस आणले आहे.आणि अशा परिस्थितीत दिलासा देणारे लोकप्रतिनिधी ही पावसाचीच 'री' ओढत असल्याने जगावे की मरावे.? हा एकच सवाल शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
पावसाळा सुरू होऊन सुमारे १ महिना २५ दिवस लोटले आहेत,आज न उद्या पाऊस पडेल या भरवश्यावर शेतकऱ्यांनी घरातील जमापुंजी तसेच उधार-उसनवारी करत पेरण्या आटोपल्या आहेत.रब्बी हंगामात कांदा पिक सर्वाधिक क्षेत्रावर लागवड होते,अगदी त्या प्रमाणेच खरीप हंगामात अन्नधान्य पिकांची जागा आता मका पिकाने व्यापली आहे.यंदा ही सरासरी पेक्षा जास्त क्षेत्रावर मका ची लागवड पूर्णत्वास गेली आहे.कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने अन्नधान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
आजमितीस तालुकाभरात पावसाची सर्वत्र उणीव भासत आहे.पिके जगवण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.तर जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे.न्यायडोंगरीचे रहिवासी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर यांनी पाणी प्रश्न कसा बिकट बनला आहे,याची झलक पंचायत समिती प्रशासनाला काल आणून दिली तर,ढेकू येथे चारा छावणी सुरू करण्याची मागणी नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी तहसीलदार आवळकंठे यांच्याकडे केली आहे.
शेतात उभी असलेली पिके,जनावरांना चारा,पाणी,आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी या समस्या पाऊस लांबल्याने निर्माण झाल्या आहेत.यावर विद्यमान लोकप्रतिनिधींकडून दिलासा देणे आवश्यक असताना,त्यांचा ही मागमूस दिसून येत नसल्याचे चित्र तालुक्याचे आहे.
Comments
Post a Comment