सा. क्रांतिवीर...श्री.क्षेत्र नस्तनपूर येथे भाविकांना स्वर्गीय सुखाची अनुभूती.!
मंत्रमुग्ध वातावरण निर्मिती करण्याचे श्रेय विश्वस्त मंडळाला....
नांदगाव----संतोष कांदे
भल्या सकाळ चे आल्हाददायक वातावरण...सभोवताली पसरलेला हिरवाकंच निसर्ग...आणि मंदिरात घुमणारे कर्णमधुर मंत्रोच्चार.. या मनप्रसन्न वातावरणाने भाविक मंत्रमुग्ध होण्याचा प्रसंग नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील श्री.शनी संस्थान मध्ये रोज अनुभवास येत आहे.
राज्यातील नव्हे तर देशातील एक प्रमुख शनी पीठ म्हणून या क्षेत्राचा नावलौकिक आहे.गेली काही वर्षे हे प्रमुख धार्मिक स्थळ राज्याश्रय न मिळाल्याने लोकाश्रयापासून वंचित राहिले,त्यामुळे महत्व असूनही विकासापासून हे देवस्थान कोसो दूर राहिले.
कालौघात तालुक्यातल्या राजकीय सारीपाटावर अनेक महत्वाचे बदल झाले,आणि त्याचेच पडसाद या ठिकाणी उमटले,'बाहेरचा' असूनही येथे लोकाश्रय मिळालेले आमदार पंकज भुजबळ यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पर्यटन विकासमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या माध्यमातून या क्षेत्राचे महत्व ओळखून भरीव विकासकामे करत या क्षेत्राचे रुपडेच पालटून टाकले,आणि भुजबळांना हे सर्व करण्यास भाग पाडण्याचे सर्व श्रेय या संस्थानचे जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर यांना जाते.
विकासकामे झाल्यानंतर त्या ठिकाणचे पावित्र्य जपत त्यात निसर्गाच्या माध्यमातून भर टाकत अत्यंत देखणा परिसर निर्माण करण्यात अड.आहेर व विश्वस्त मंडळाला यश आल्याचे आजचे चित्र पाहून खात्री पटते.मग त्यात थेट पाच वर्षे वयाची वृक्ष लागवड,बालकांना मोफत धार्मिक शिक्षण,दरवर्षी नित्यनेम भरणारा अखंड हरिनाम सप्ताह,दर शनिवारी मोफत अन्नदान,आणि सर्वात महत्वाची अभिनव कल्पना म्हणजे राज्यभरातून सुप्रसिद्ध व्यक्ती आमंत्रित करून त्यांचे हस्ते होणारी 'महाआरती' चर्चेचा विषय झाली आहे.
आजमितीस प्रसिद्ध मान्यवरांसह पंचक्रोशीतील सामान्य शेतकरी कुटुंबांना ही या महाआरती चा मान देत,या अभिनव कल्पनेने एक वेगळीच उंची गाठली आहे.
Comments
Post a Comment