सा. क्रांतिवीर...८०० क्विंटल कांदा सडला ; ९७ एकरातील मका पिक वाळून गेले.
नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील ३४ शेतकऱ्यांना सुमारे १८ लाख ३९ हजार रुपयांचा फटका
नांदगाव---/संतोष कांदे
पेरणी होऊन एक ते दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे.पाऊस नसल्याने सुमारे ३९ हेक्टर (९७ एकर) क्षेत्रातील मका पिक जळून गेल्याने मशागत,बियाणे असा सुमारे ३ लाखांचा फटका नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील ३४ शेतकऱ्यांना बसला आहे,तर शेषराव घुगे यांचा चाळीत साठवलेला ८०० क्विंटल कांदा सडून सुमारे ८ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,येथील शेतकरी शेषराव घुगे यांनी स्वतःचे उळे (रोप) खराब झाल्याने बाहेरून ३ लाख ५० हजारांचे रोप घेऊन ७ एकर कांदा लागवड केली होती.या लागवडी साठी त्यांना मशागत-६० हजार,लागवड-४२ हजार रुपये (एकरी-६ हजार),निंदणी-३५ हजार,रासायनिक खते-१ लाख रुपये,फवारणी-६० हजार,कांदा काढणी-४२ हजार,चाळी भरणे-५० हजार असा ६ लाख ५९ हजार रुपये खर्च आला होता.यातून जवळपास ८०० क्विंटल कांदा उत्पादित झाला होता.तो कांदा भाव उतरल्याने चाळीत साठवून ठेवला होता.
सध्या भाव १ हजाराच्या आसपास आल्याने चाळ खोलली असता,पूर्ण ८०० क्विंटल कांदा सडून गेल्याचे निदर्शनास आल्याने घुगे हवालदिल झाले आहेत.सध्याच्या बाजार भावानुसार त्यांना सुमारे ८ लाख ८० हजारांचा फटका बसला आहे.या कांद्याच्या भरवश्यावर बँक,पतसंस्था,खाजगी सावकार यांची देणी कशी फेडावी असा यक्षप्रश्न घुगे यांच्या समोर उभा ठाकला आहे.तर घुगे यांच्यासह बाबाजी मोहिते-१०० क्विंटल (१ लाख रुपये),रामभाऊ गिरे-१०० क्विंटल (१ लाख रुपये) असा एकूण १ हजार क्विंटल कांदा सडून गेला आहे.
तर पाऊस नसल्याने येथील लिलाबाई घुगे,शबीर शेख,रामभाऊ गिरे,निवृत्ती आव्हाड,सुपडू आव्हाड,देविदास दाभाडे,दिलीप गरुड यांच्यासह २७ शेतकऱ्यांच्या सुमारे ९७ एकरातील मका पिकं पावसाअभावी पूर्णतः नष्ट झाले असल्याने त्यांना ही अंदाजे ३ लाख रुपयांचा फटका बसला आहे.
या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा.अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment