सा. क्रांतिवीर....वारकरी आणि प्लास्टिक बंदी.!
नांदगाव--संतोष कांदे
विठुरायाची भक्ती पावन व्हावी,आणि जीवनात अजाणतेपणी झालेल्या पापाचे क्षालन व्हावे,किंवा यासह अतूट भक्तीच्या गोडी पोटी ऊन-पावसाची तमा न बाळगत शेकडो किलोमीटर अंतर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 'प्लास्टिक बंदीची' अट शिथिल करावी अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे.
सोशल मिडियात व्हायरल झालेल्या या पोस्ट मध्ये पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्राला शेकडो वर्षांची परंपरा असलेली आळंदी ते पंढरपूर पायी वारी दिनांक ७ जुलै २०१८ पासून सुरू होत आहे. ह्या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी चालत असतात, माऊलीच्या भक्ती पोटी ऊन, वारा आणि पाऊसाची तमा न करता तो पंढरीची वाट चालत असतात.
पावसापासुन रक्षण करण्यासाठी तो छत्री ऐवजी तो "कागद" वापरणे पसंद करतो. " कागद " हा शब्द वारकरी बोली भाषेत प्लॅस्टिक कागदाला वापरला जातो. पण तुम्ही तर प्लॅस्टिक कागदावर बंदी आणली आहे. वारकर्याला पाऊस चालू असताना छत्री घेऊन चालणे खूपच त्रासाचे होणार आहे. कागद डोक्यापासून गुढग्यापर्यंत घेतला की चालणे अवघड होतं नाही, शिवाय पाऊस गेला की त्याची घडी करून चालताना बाळगणे सोपे जाते आणि तोच कागद क्षणभर विश्रांतीच्या वेळेस ओल्या जमिनीवर टाकून बसायला,ओल्या जमिनीवर कागद टाकून जेवायला, झोपायला खूपच सोयीस्कर पडतो. जोराचा पाऊस सुरू झाला तर हाच कागद गळणाऱ्या तंबूच्या ताडपत्रीवरही टाकता येतो.
वारी सुरू असताना हा प्लॅस्टिक कागद किती महत्वाचा आहे हे फक्त वारीत चालणाऱ्या वारकर्यालाच माहिती असते. अश्या कागदावर पर्यावरणाच्या दृष्टीतुन कायदाने बंदी आणलीत, हे समजू शकतो पण वारी दरम्यान आम्हा वारकर्याना हा प्लॅस्टिक कागद वापरण्यास परवानगी द्यावी.अशी विनंती या पोस्ट द्वारे करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment