सा. क्रांतिवीर
तप्त ढेकळे फोडणाऱ्या पावसाची प्रतीक्षा
नांदगाव-------संतोष कांदे
सुरुवातीच्या कांदा बाजार भावाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला असल्याने,पुन्हा एकदा शेतकरी हा जुगार खेळण्यास सज्ज झाले आहेत.खरीपपूर्व मशागत करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना तप्त ढेकळे फोडणाऱ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
गत वर्षीच्या हंगामात कांदा पिकाला चांगला भाव मिळाल्याने सामान्य शेतकरी ही बऱ्यापैकी आर्थिक उपलब्धता करू शकला.मात्र कमी उत्पादन खर्च असलेल्या मका पिकासाठी १४२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर होता,मात्र मका खरेदी करून ती साठवण्यासाठी गोदाम उपलब्ध होऊ न शकल्याने ह्या भावाचा फायदा अगदी बोटावर मोजता येईल,इतक्याच शेतकऱ्यांना झाला.
कांदा पिकाला भाव चांगला मिळाला असला तरी,विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे वेळेवर मिळू न शकल्याने सर्व 'मुसळ केरात' अशी गत अनेक शेतकऱ्यांची झाली होती.पैसे बाकी असताना ही पावतीवर पेड चा शिक्का मारून घेणारे शेतकरी जेव्हा एक महिन्यानंतर ही पैसे मिळत नव्हते,तेव्हाच तक्रार दाखल करत असल्याने हे पैसे मिळवून देण्यासाठी बाजार समिती प्रशासन ही अनेक वेळा हतबल झाल्याचे चित्र दिसून आले.
निर्सगाने दिले,मात्र चुकांनी हिरावले अशी गत अनेकांची झाली.हितसंबंध जोपासण्याच्या नादात अनेकांना आर्थिक फसवणुकीला ही सामोरे जावे लागले.नोटबंदी मुळे हा प्रकार उदभवल्याचा दावा व्यापारी करत असले तरी पूर्वी ही रोख रकमेबाबत हाच प्रकार अनेक व्यापारी करत होते,मात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी विना तारण मोठी रक्कम संबधित व्यापाऱ्यांकडून मिळत असल्याने त्याचा गवगवा नव्हता इतकेच.!
पशुधन मोठ्या प्रमाणात घटल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा ही यांत्रिक पद्धतीने खरीपपूर्व मशागत करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.तसेच मजूर टंचाईवर परप्रांतीय मजुरांचा पर्याय उपलब्ध झाल्याने शेतमाल वेळेत बाजार समितीमध्ये पोहचू शकला.मात्र हा प्रकार स्थानिक शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात मारक ठरणार आहे.
Comments
Post a Comment