सा. दामिनी
नांदगाव-----संतोष कांदे
जमिनीच्या गर्भातील पाण्याचा झरा आटत चालला असला तरी,मानवाच्या ह्रदयातील माणुसकीचा झरा मात्र अजूनही निरंतर वाहतो आहे.नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावरील बोलठाण गावातील तरुणांचा मुक्या जनावरांना पाणी पाजण्याचा उपक्रम याचे उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे.
बोलठाण गावातील वाघोबा चौकातील तरुणांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना,मानव जातीशी ज्यांचे अनादी काळापासूनचे ऋणानुबंध जुळले आहेत,त्या मुक्या जीवांचा विचार गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी केला,ते आजतागायत या मुक्या जनावरांना स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडत आहेत. बोलठाणसह परिसरात अनेक वेळा पाणी टंचाईची परिस्थिती उदभवली.व सद्यस्थितीत ही फारशी वेगळी स्थिती नसताना ही त्यांच्या उपक्रमात तसूभर ही खंड पडलेला नाही,हे विशेष .!
तोंडाने बोलता येणाऱ्या मानवासाठी जागोजागी पाणपोई सुरू झाल्या आहेत,मात्र या मुक्या जनावरांसाठी पाणपोई सुरू करून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवणारे हे तरुण आदर्शपणाचा कळस म्हणावे लागतील.!
गावातील वाघोबा चौकात हा उपक्रम ४/५ वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे. जनावरांकरिता सकाळी नऊ वाजता व दुपारी पाच वाजता लोखंडी कढई पाण्याने भरण्यात येते.जवळपास ४० ते ५० जनावरे आपली तहान येथे भागवतात.या उपक्रमाचा प्रचार व प्रसार होऊन इतरांनाही या पासून स्फूर्ती मिळावी.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment