विशेष बातमी
जळगाव बुद्रुक संतोष कांदे
यापूर्वी पाहिलेले नस्तनपूर व आताचे यात आमूलाग्र बदल झाला आहे,परिसराचे सौंदर्य व स्वच्छता यामुळे देवस्थानाला एक वेगळीच झळाळी आली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदूरीकर) यांनी नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील श्री.शनैश्वर महाराज जन्मोत्सव निमित्त आयोजित गाथा पारायण सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफताना केले.
या सोहळ्याचे हे १५ वे वर्ष आहे.हभप.निवृत्ती महाराज उपस्थित भाविकांना व्यंगात्मक उपदेश करताना पुढे म्हणाले की,कितीही कमवा पण शेवटी ठोकळा (रुपयाचे नाणे) च असतो.याचे प्रमाण नोटबंदी झाली,पण नाणे बंदी झाली का.? तसेच फक्त वेतन घेवून नोकरी केलेले,आणि नोकरीत लाच घेवून श्रीमंत झालेले बघा...त्यांचे उतारवयातले आयुष्य वेडेपण किंवा गोळ्या औषधामध्येच संपते.
मुलींच्या मोबाईल वापरावर ही त्यांनी कठोर शब्दात प्रहार करत आई-वडिलांचे चांगलेच कान टोचले.जनतेच्या संरक्षणासाठी किंवा ज्यांचे आयुष्य कायम पणास लागलेले असते.त्यांना मिळणारे वेतन अत्यल्प तर चार भिंतीत सुरक्षित नोकरी करणाऱ्यांचे वेतन भरमसाठ.! हा विरोधाभास मांडत सैन्य दलाच्या जवानांना मिळणाऱ्या वेतनाबाबत समाधान ही व्यक्त केले. चौफेर फटकेबाजी करत त्यांनी हसता-हसता अंतर्मुख केले.
१५ मे पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली बेलदारवादी,अंकुर महाराज साखरे गेवराई,पांडुरंग महाराज गिरी वावी, ज्ञानेश्वर महाराज पठाडे केज,प्रकाश महाराज साठे बीड,सोपान महाराज शास्त्री हिंगोली हे ज्ञानामृत देणार आहेत.व काल्याचे कीर्तन तुकाराम महाराज जेऊरकर करणार आहेत.
या सात दिवस चालणाऱ्या सोहळ्यासाठी संस्थानचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार अड.अनिल आहेर,अध्यक्ष नारायण अग्रवाल,विश्वस्त विजय चोपडा,खासेराव सुर्वे,उदय पवार,व कर्मचारी कष्ट घेत आहेत.
Comments
Post a Comment