दामिनी
नांदगाव संतोष कांदे
माझे पत्रकारितेतील प्रेरणा स्थान भास्कर कदम यांचा वाढदिवस त्या निमित्ताने.....
मला आजही आठवतो तो दिवस......वडिलांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले,आणि त्यामुळेच अत्यंत गरिबीत दिवस काढत दहावी पास झालो,अकरावी ला प्रवेश घेताना ; जर जातीचा दाखला असेल तर ९०० रुपये शिष्यवृत्ती मिळते.अशी माहिती मिळाल्याने मिशन 'जातीचा दाखला' सुरू झाले.
एक एक कागद जोडत प्रस्ताव तयार होऊन तहसील च्या लाल फितीत दाखल झाला.एक महिन्याची मुदत घेऊन घरी परतलो.आणि त्यानंतर महिना पूर्ण झाला,पण दाखला काही आला नाही.तो दिवस वाया गेला.त्यानंतर मात्र सुट्ट्या असल्याने १० रुपये मजुरी ने शेतकऱ्यांकडे कामास जाऊ लागलो.आणि दर गुरुवारी इतर लोक बाजारासाठी तर मी दाखल्यासाठी नांदगाव ला जाऊ लागलो.
दर वेळी कुठली तरी एक क्युरी लागायची,अन १० ते २० रुपये दिले की,दूर ही व्हायची.आणि हा भ्रष्टाचार आहे,असे कधी तेव्हा वाटले नाही.पण साहेब माझे ऐकतात.हा अहंभाव मात्र तेव्हापासून माझ्यात जोपासला जाऊ लागला.असे करता-करता ६ महिने उलटले,पण दाखला काही आला नाही.मग आंबेडकर चौकातील गुड लक या सलून दुकानातील राजू भाऊ ने त्याच्या समोरच असलेल्या प्राची प्रिंट' या नावाकडे बोट दाखवून तेथे तुला मदत मिळेल,असे सांगितल्याने तेथे गेलो.
तेथे चार-पाच जण बसलेले असल्याने भास्कर भाऊ कोण आहेत.? अशी विचारणा केली.तेव्हा त्यांनी काय काम आहे.? असे विचारले,आणि मग जाणले की,हेच भास्कर भाऊ आहेत.बसवून सर्व सविस्तर वृत्त जाणून घेतले.आणि तहसीलदार एम. बी.काळे यांना फोन केला.त्या फोन नंतर त्यांनी मला सांगितले की,थेट तहसील च्या दरवाज्यासमोर लाल दिव्याची गाडी उभी असेल,त्या गाडी जवळच उभा रहा.! आणि आतून प्रथम जे साहेब येतील,त्यांना तुझे नाव,गाव सांग....आणि मी तेथून निघून आल्यानंतर त्यांनी तहसीलदार च्या फोनवरून तेथे आलेले प्रांताधिकारी तेजवीर सिंह यांना माझ्या दाखल्याचा इत्यंभूत प्रवास कथन केला.
आणि प्रांताधिकारी बाहेर आल्यानंतर मी काय बोलायचे हे त्यांनी माझ्यावर सोडून दिले,फक्त हे बजावले की,आज जे काही बोलशील त्यावर तुझा दाखला अर्जंट मिळेल,नाहीतर टांगला च म्हणून समज...
मग मी १० ते २० रुपयांचा कसा उपयोग होतो,आहे यासह घरची गरिबी ही कथन केली,आणि काय आश्चर्य.!!!!!
आठव्या दिवशी माझा जातीचा दाखला पोस्टाने घरपोच आला.पोस्टाने जातीचा दाखला घरपोच मिळालेला त्या काळातील मी पहिलाच असावा कदाचित.!.....मात्र तेव्हापासून पत्रकार पॉवरफुल असल्याची जाणीव झाली.आणि पत्रकारांनी वेळोवेळी गनिमी कावा ही वापरला पाहिजे,हे ही तेव्हापासूनच शिकलो.
पण असो.....भाऊंची पत्रकारिता म्हणजे त्यात सर्वच अनधिकृत धंद्यावाले दुखावले जात असल्याच्या घटना वारंवार घडत असत.पण तरीही सर्वसामान्य जनतेसाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी असते.त्यांना पुढील आयुष्य सुख,समाधान व आरोग्यमय असो...........
Comments
Post a Comment